औरंगाबाद – दिवाळीसाठी माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या दोघा साडूंचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे डोंगरगाव (कवाड) येथील दोघी बहिणी एकाच दिवशी विधवा झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे.
असा झाला अपघात
दिवाळीच्या सुट्यांमध्ये
माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी औरंगाबादमधील आयोध्यानगर सिडको येथील सुनील
विनायक काकडे (३४) आणि फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव येथील जगन्नाथ फकिरबा बोडखे
(४०) हे दोघे साडू आणि भीमराव बोडखे (४०) इंडिका कारने (एमएच २० डीएम ९०७६) डोंगरगावकडे
(कवाड) निघाले होते. रात्री साधारण ११.३० वाजता राजूर रोडवरील पाल फाटा येथे
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला जाऊन आदळली. मध्यरात्रीदरम्यान
घडलेल्या या अपघातात सुनील काकडे आणि जगन्नाथ बोडखे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
भीमराव बोडखे हे गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुनील काकडे आणि जगन्नाथ
बोडखे हे एकमेकांचे साडू होते. त्यांच्या मृत्यूमुळे डोंगरगावच्या (कवाड) दोन
बहिणींवर एकाच दिवशी विधवा होण्याची वेळ आली आहे. यामुळे डोंगरगाव शोकमग्न झाले
आहे.












